कांदा लागवड संपूर्ण माहिती: रोग आणि कीड व्यवस्थापन, खत पाणी व्यवस्थापन

Kanda Lagwad: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये कांदा लागवड विषयी माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये कांद्यासाठी आवश्यक हवामान, आवश्यक जमीन, पूर्वमशागत कशी करायची, कांदा लागवड हंगाम, कांद्याच्या जाती वाण, दर हेक्टरी प्रमाण किती वापरायचे, लागवड कशी करायची, खत आणि पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत रोग व कीड व्यवस्थापन, उपाय, काढणीपश्‍चात व्यवस्थापन इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखांमध्ये आज मिळणार आहेत. त्यासाठी हा लेख संपूर्णपणे नक्की वाचा.

Kanda Mahiti कांदा माहिती

कांदा हे व्यापार करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पीक आहे. भारतीयांच्या आहारामध्ये कांद्याचा वापर हा रोज केला जातो. कांदा पिकवणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हा कांदा पिकाच्या उत्पादनासाठी आणि कांदा पीक अंतर्गत क्षेत्रासाठी अग्रस्थानी आहे. महाराष्ट्र मध्ये अंदाजे १ लाख हेक्‍टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते. त्यामध्ये नाशिक, सोलापूर, पुणे, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा पिकवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. याच प्रमाणे मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या मधील काही जिल्ह्यांमध्ये देखील कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा हा भारतात कांदा पिकवण्यासाठी प्रसिद्ध आहे. कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रातील 37 टक्के कांदा तर भारतातील १० टक्के कांद्याचे उत्पादन हे एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये घेतले जाते.

कांदा पिकासाठी आवश्यक हवामान

कांदा हिवाळी हंगामामध्ये पीक असून महाराष्ट्रातील सौम्य हवामानात कांद्याची दोन ते तीन पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून एक-दोन महिन्यांमध्ये हवामान थंड असणे गरजेचे आहे. कांदा मोठा व्हायला लागला की, तापमानातील वाढ कांद्यासाठी उपयुक्त ठरते.

कांदा लागवडी साठी आवश्यक जमीन

कांदा पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते. कांद्यासाठी भुसभुशीत आणि सेंद्रिय खतांनी परिपूर्ण असलेली मध्यम ते कसदार जमिनीमध्ये कांद्याचे पीक चांगले येते.

कांदा पिकाची पूर्व मशागत कशी करावी?

कांदा पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची उभी-आडवी नांगरणी करून घ्यावी. आणि कुळवाच्या पाळ्या देऊन जमिनीतील ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये हेक्‍टरी 40 ते 50 टन शेणखत मिसळावे.

मिरची लागवड माहिती । Mirchi Lagwad Mahiti in Marathi

कांद्याची लागवड कोणत्या हंगामामध्ये करावी?

 • कांद्याची लागवड महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामातजून ते ऑक्टोबर मध्ये केली जाते.
 • रब्बी हंगामात कांद्याची लागवड नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्ये केली जाते.
 • उन्हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्यामध्ये कांद्याची लागवड शेतकरी करतात.

कांद्याचे वाण

 • बसवंत 780
 • एन ५३
 • एन 2-4-1
 • पुसा रेड

हेक्टरी बियाणांचे प्रमाण किती वापरावे?

कांदा पिकाच्या पिकासाठी कांद्याचे दर हेक्टरी १० किलो बियाणे पुरेसे असते.

कांदा पिकाची लागवड कशी करावी?

 • कांदा पिकाची लागवड करताना, कांद्याची रोपे गादीवाफे तयार करणाऱ्या क्षेत्राची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. गादीवाफा १ मीटर रुंद ३ मीटर लांब आणि 15 सेंटिमीटर उंच करावा.
 • वाफ्यातील ढेकळे बाजूला काढावीत.
 • रुंदीशी समांतर ५ सेंटीमीटर बोटाने रेषा पाडावेत आणि त्यात बी पातळ पेरावे आणि हे बी मातीने झाकून घ्यावे.
 • बी उगवून येईपर्यंत त्याला पाणी घालावे.
 • बी उगवल्यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे.
 • रोपांना गाठी तयार झाल्या की रोप लागवड योग्य झाले असे समजावे.
 • खरीप कांद्याची रोपे साधारणपणे सहा ते आठ आठवड्यांनी तयार होतात. तर रब्बी कांद्याची रोपे आठ ते नऊ आठवड्यांनी तयार होतात.
 • रोपे काढण्यापूर्वी 24 तास अगोदर गादीवाफ्यात पुरेसे पाणी द्यावे.
 • कांद्याची लागवड गादीवाफ्यावर तसेच सरी वरंब्यावर करता येते.
 • सपाट वाफ्यामध्ये हेक्टरी रोपांची प्रमाण जास्त असले, तरी देखील मध्यम आकाराचे एकसारखे कांदे तयार होतात.
 • सपाट वाफा दोन मीटर रुंद आणि उताराप्रमाणे वाफ्याची लांबी ठेवावी.
 • रोपांची लागवड सकाळी अथवा संध्याकाळी करणे गरजेचे असते.
 • 12.5 बाय 7.5 सेंटीमीटर अंतरावर रोपांची लागवड करावी.

फुलकिडे आणि करपा रोग आणि कीड व्यवस्थापन कसे करावे?

 • फुलकिडे आणि करपा यांच्या नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात 15 मिली मोनोक्रोटोफॉस व 25 ग्रॅम डायथेनएम 45 तसेच 50 ग्रॅम युरीया व 10 मिली सॅडोवीट
 • यासारखी चिकट द्रव्य मिसळून दर दहा दिवसांच्या अंतराने चार ते पाच फवारण्या कराव्यात.

कांदा खत आणि पाणी व्यवस्थापन

 • कांदा पिकास हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश लागवड करते वेळी द्यावे.
 • लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्र प्रति हेक्‍टर असे द्यावे.
 • कांदा पिकाला नियमितपणे पाणी देणे महत्त्वाचे असते.
 • खरीप हंगामामध्ये 10 ते 12 दिवसांच्या अंतरावर तर रब्बी हंगामामध्ये उन्हाळ्यात ६ ते ८ दिवसाच्या अंतराने आपल्या जमिनी प्रमाणे पाणी द्यावे.

आंतर मशागत

कांद्याच्या रोपांची लागवड केल्यानंतर शेतात तण असेल, तर हलकी खुरपणी करावी.
कांदा काढणीपूर्वी ३ आठवडे अगोदर पाणी बंद करावे म्हणजे पानातील रस कांद्यामध्ये लवकर उतरतो. त्यामुळे कांद्याच्या माना पडून कांदा काढणीसाठी तयार होतो.

रोग आणि कीड

करपा

कांद्यावर पडणारा मुख्य रोग म्हणजे करपा हा रोग बुरशीनाशकाचा पासून होतो. या रोगामुळे कांद्याच्या पातीवर लांबट गोल तांबूस चट्टे पडतात. शेंड्यापासून पाने जळाल्या सारखी दिसतात. पाहिले तर खरीप हंगामातील कांद्यावर करपा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसतो.

फुल किडे किंवा अळया

फुल किडे किंवा आअळया अगदी लहान आकाराचे कीटक पातीवरील तेलकट पृष्ठभागात खरडतात व रस शोषून घेतात. त्यामुळे कांद्याच्या पातीवर पांढरे ठिपके पडलेले दिसून येतात.

कांद्याचे काढणीपश्‍चात व्यवस्थापन

 • कांद्याचे पीक कांदा लागवड केल्यापासून ३ ते ४.५ महिन्यांमध्ये काढणीसाठी तयार होते.
 • कांदा जेव्हा मानेत पिवळा पडतो आणि त्याची जात आडवी पडते यालाच मान मोडणे असे म्हणतात.
 • जेव्हा 60 ते 75 टक्के कांद्याच्या माना मोडल्यास कांदा काढणीस पक्व आहे असे समजले जाते.
 • आजूबाजूची माती सैल करून कांदे उपटून घेतले जातात.
 • काढणीनंतर ४ ते ५ दिवसांनी कांदा पाती सकट शेतात लहान ढीग करून ठेवला जातो नंतर कांद्याची पात कापली जाते.
 • ही पात कापताना ३ ते ४ सेंटीमीटर लांबी ठेवून पात कापली जाते.
 • यानंतर कांदा ४ ते ५ दिवसात दिवस सावलीमध्ये सुकला जातो.
 • दर हेक्टरी कांद्याचे उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.

आम्ही या लेखाच्या माध्यमातून कांडा पीक लागवड ची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप तुम्हाला शंका असतील, तर आम्हला कंमेंटमध्ये नक्की विचारा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top